शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (किंवा तसा प्रयत्न करणे), त्यांच्यातला आर्टिस्ट बाहेर काढणे (सोबत आपल्यातला दडलेला/दडवून ठेवलेला कलाकार बाहेर काढणे), घरी बसून त्यांना शाळेची तोंडओळख करून देणे ही सगळी कामे पालकांची.
सुट्ट्यांमध्ये बारक्यांना एंगेज ठेवणं खूप अवघड काम आहे. त्यांच्या डोळ्यांना आणि हातांना सतत काही ना काही चाळा हवा असतो. गार्गीच्या शाळेला सध्या सुट्टी आहे. नकळतपणे शाळेच्या टचमध्ये राहता यावं म्हणून ती कधी मला तिचा 'सर' बनवते तर कधी सौं ना तिची टिचर बनवते आणि तिला होमवर्क द्यायला सांगते. नर्सरीमध्ये सुबक अक्षर वगैरेचा काही संबंध नसतो. पोरं हातात पेंसिल धरतात हेच पालकांवर थोर उपकार असतात.
असो. गार्गीला आज पुन्हा अभ्यासाची लहर आली. तिला मी काही ॲल्फाबेट्स दिले काढायला. तिने ते काढले आणि मला तपासायला दिले. 1 रूम किचनचा प्रत्येक कोपरा जसा व्यापावा तसं गार्गीने वहीतल्या चौकोनाचा प्रत्येक कोपरा एका ॲल्फाबेटने व्यापला होता.
मी: "पिल्लू, अक्षर थोडं बारीक काढ. चौकोनाला चिटकवू नकोस."
गार्गी: "तू मला नंबल्स दे, मग मी बालीक काडते."
मग मी तिला काही नंबर्स वहीत काढून दिले. तिनेही ते वहीत गिरवून मला पुन्हा तपासायला दिले. ते पाहून मी एकदम आवाक होऊन नुसतं हसत सुटलो. माझा माझ्या चष्म्यावर विश्वासच बसेना की लेकीने पटकन माझा सल्ला कसा काय ऐकला कारण यापूर्वी पण तो तिला बर्याचदा देण्यात आला होता पण अमलात मात्र कधी काही आलं नव्हतं.
'चित्र Speaks Louder Than Words' असं म्हणतात म्हणून नेमकं काय घडलं याचा फोटो खाली अपलोड करत आहे.
No comments:
Post a Comment