सगळं काही सुरळीत सुरु होत. अचानक, न्यूज चॅनेल्सना एक खाद्य हळू-हळू मिळू लागत. कुठेतरी एका व्हायरसचा जन्म होतो. पुढे तो आपल्या प्रत्येक जेवणात तोंडी लावायचा पदार्थ बनून जातो. जिकडे तिकडे याची आणि याच्या प्रचारकांची चर्चा सुरु होते. सुरुवातीला खूप सारे नकारात्मकतेचे डोस नियमित पाजले गेले. याला कुठल्याच माध्यमाचा अपवाद नव्हता. नंतर हे डोईजड होऊ लागलं तेव्हा कुठे काहीश्या आल्हाददायक बातम्या येऊ लागल्या. नाकारात्मकतेच्या पलीकडे जाऊन कोरोनाकडे पाहू जाऊ लागलं.
लोकांचा पूर्वी जो काही ओरडा असायचा तो बहुतांशरीत्या कोरोनामुळे काही काळासाठी का होईना पण दूर झाला.
ऑफिसमध्ये नको ते चेहरे रोज पहावे लागतात = घरून काम करा
ट्रॅफिकमध्येच आमच निम्म आयुष्य निघून जात = घरून काम करा
कितीही पगार वाढला तरी तो काही पुरत नाही = घरातच बसा, खर्च कमी होईल
बायका-पोरांसोबत वेळ घालवता येत नाही = घरातच बसा
नातेवाईक किंवा मित्रपरिवारासोबत संपर्क फार कमी झालाय = पुन्हा विस्कटलेली घडी सरळ करा
नोकरीमुळे छंद/कलागुण मागे पडले = पुन्हा सुरु करा
बरेच दिवसात चांगला चित्रपट पहायला मिळालेला नाही = आता चित्रपट, वेबसिरीज किंवा हव ते आवडत पाहिजे तितक पाहू शकता
माणसांचे चेहरे रोज वाचावे लागतात आणि वाचन मात्र थांबलय = पुन्हा मूळ वाचन सुरु करा
या आणि अश्या अनेक चांगल्या बाबी आपल्याला आता जाणवू लागल्यात. मलाही याचे अनेकविध फायदे होत आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे माझ्या पिल्लासोबत म्हणजेच गार्गीसोबत मुबलक घालवता येणारा वेळ. पूर्वी तिला बागेत चक्कर मारूनच आणायला लागायची पण आता ते शक्य नाही. मग करायचं काय याच उत्तर मी फार लवकरच शोधून काढल होत. 'बाहेर गेल की पोलीस फटके मारतात' असं मी गार्गीला सांगून ठेवलय. तिला याचा विसर पडू नये आणि तिने बागेत जायचा पुन्हा हट्ट धरू नये (लॉकडाऊन संपेपर्यंत) म्हणून तिला मी सातत्याने पोलीस लोकांना अडवत/बडवत आहेत याच्या बातम्या दाखवू लागलो. (तसा मी एरवी एवढा निष्ठुर नाही!)
एकदा मी भाजी घेऊन घरी आलो आणि तिला म्हणू लागलो "पिल्लू, पोलीसांनी मला काठीने फटके मारले". बिचारी काळजीच्या स्वरात मला म्हटली-
" हो का? तुम्ही बाहेर नका जाऊ. मी तुम्हाला कीम लावते. "
बास! तेव्हापासून मॅडम जेवत नसल्या, बातम्या पाहू देत नसल्या, झोपत नसल्या किंवा अजून काही आमच ऐकत नसल्या की पोलीसांचा जालीम उपाय बाहेर निघतो (त्यांच्या रेफ्रन्सचा!). एरवी तशी खूपच शिस्तप्रिय आहे माझी पोर!
तिच्याशी संभाषण म्हणजे चौकार-षटकारांची आतषबाजी असते. ती कधी काय भारी बोलेल याचा नेम नसतो. यू ऑलवेज हॅव टू बी ऑन युअर टोज ड्यूरिंग एव्हरी कॉनवर्जेशन विथ हर! खूप साऱ्या गमती जमती घडल्या ज्याच थोडक्यात संकलन मी माझ्या मोबाईलमध्ये करून ठेवल होत जे ब्लॉगच्या रूपाने मला समोर आणायच होत.आज तो योग आला.
तिच्या अजरामर संवादांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
१) " मम्मा ढुबूढुबू दिसतीये, तुम्ही दुसरी बायको आणा ".
हे मुळात वास्तव नसल तरी पोरीच्या या दिलदार वाक्याने पाणीच आणल बघा माझ्या डोळ्यात ;)
२) सासरेबुवा (ज्यांना गार्गी बाबाअसं संबोधते आणि मला पप्पा... सध्या 'चुलज' असं म्हणते) बालाजीदर्शन करून आले होते त्यावर मॅडमची प्रतिक्रिया-
" माझे बाबा पण टुकलू झाले, केत बालीक झाले."
३) टी. व्ही. वर अक्षय कुमारच्या सिनेमामधल्या एका सीनमध्ये तो रडत असतो. गार्गी १.५ - २ वर्षांची असल्यापासून काही नट-नट्यांची व क्रिकेटर्सची नावे अचूकपणे सांगते. त्यामुळे अक्षय तसा तिच्या ओळखीचा नट.
मी तिला उगाच डिवचलं- " बघ ग, अक्षय रडतोय. जा त्याचे डोळे पूस."
गार्गी - " मला टी. व्ही.मध्ये नाही जाता येत. "
४) एकदा आमच्या मस्ती-सेशन दरम्यान, मी हॉलमध्ये पळून जातोय असं तिला भासवलं आणि मधूनच माघारी आलो तिच्याकडे. ती लाडीकपणे चिडली आणि तिच्या मम्मीला म्हणाली-
" मम्मा, ये चोर है ... पप्पा नहीं है. मुझे उल्लू बनाया. " (या सोज्वळ हिंदीच्या संस्कारांसाठी कार्टून चॅनेल्सचे आभार!)
५) एकदा ' रामायण ' सुरु होतं (टी. व्ही. मधलं!!). रावण आणि कालनेमी राक्षस यांच्यातला संवाद सुरु होता. मी आणि सौ. तल्लीन होऊन ते बघत होतो तितक्यात आमच्या छोट्या समीक्षिका उदगारल्या-
" हे बेले आहेत ... भोंगले आहेत .... ह्यांनी शर्ट नाही घातला "
(मी पटकन मनात रावण, कालनेमी आणि रामानंद सागरांची माफी मागितली!)
६) पुन्हा एक रामायणातलाच प्रसंग. हनुमान द्रोणगिरी पर्वत घेऊन उडत निघालेले असतात. त्या एपिसोड आधी काही पूर्वीच्या भागांमध्ये मी हनुमानाची ओळख गार्गीला करुन दिली होती. त्याची चाचणी घ्यायची मला हुक्की आली. मी तिला विचारलं " पिल्लू, हनुमान माहिती आहे ना, कोण आहे सांग? "
तिच उत्तर आलं- " ते गुनगुनाती मध्ये टी. व्ही. मध्ये उडत असतात. "
गार्गीला गाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून तिच्या लहानपणापासून माझे नानाविध प्रयत्न सुरु असतात ज्याला भरघोस यशदेखील मिळतंय. तर याच प्रयत्नातून तिच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी एक तयार झाल ३ इडियट्स चित्रपटातल 'जूबी डूबी जूबी डूबी पंपा'. या गाण्याची सुरुवात आहे "गुनगुनाती.... है ये हवाएं".
या गाण्याच्या एका दृश्यात आमिर खान हनुमान बनून टी. व्ही. मधल्या एका चॅनेलमध्ये उडत असतो. आमच्या विदूषीने हनुमानाचा हाच तो प्रांजळ रेफरन्स दिला!
७) लॉकडाऊनमुळे खूप सारे प्रयोगशील लोक आणि त्यांचे जादूचे खेळ समाजापुढे आले. यातलीच एक माझी सहचारिणीदेखील होती. तिच्या अनेक यशस्वी प्रयोगांमधील एक यशस्वी प्रयोग म्हणजे सोलकढी. ती केल्या केल्या तिने तेच केल जे सगळे करतात. येस! व्हॉट्सऍप स्टेटस! सोलकढीने भरलेल्या ग्लासांचं.
गार्ग्याची ते स्टेटस पाहून प्रतिक्रिया-
" मम्मीचं तोंड कुठे गेल? "
(याच कारण म्हणजे तिने स्वतः तिच्या मम्मीचे आणि माझे सोलकढीच्या ग्लासासोबत काही फोटो काढले होते पण स्टेटसमध्ये केवळ तिला ग्लासच दिसले!)
८) याच लॉकडाऊनमुळे घराघरात सध्या साधु-संन्याश्यांचा वास आहे. तर असच एकदा गार्गीचा माझी दाढी-मिशी कुरवाळण्याचा किंवा म्हणू शकता ओढण्याचा कार्यक्रम सुरु होता (बायकोने इथे रिझाईन करून बरीच वर्ष लोटली!). अफाट निरीक्षणशक्ती असलेल्या या निष्पाप जिवाने माझ्या चेहर्यावरील झाडे-झुडपे नीट पहिली आणि ती म्हटली:
" पप्पा, मिशी नाकात चाललीये! " (मी तिला म्हटलं बाई गंगा उल्टी वाहत नसते!)
तर अश्या आणि अजून अनेक खुमासदार प्रसंगांनी भरलेला माझा हा लॉकडाऊन चा काळ जो गार्गीने अगदी समृद्ध करून टाकलाय. मीही या काळात बरंच काही वेगळं पहिल्यांदाच केल पण जे काही गार्गीने भरभरून मला या काळात दिलं त्याला कशाचीच तोड नाही!!!
तुमच्याही काही गमती जमती असतील या काळातल्या. तर करा मग सगळ्यांशी शेअर.
सकारात्मकतेच पारडं आपण असच सगळे मिळून जड करत जाऊया!
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
No comments:
Post a Comment