मला क्रिकेटचं जाम वेड असल्यामुळे प्रत्येक मॅच पाहताना मी गार्गीला खेळाडूंची नावे आणि इतर क्रिकेटशी निगडित माहिती सतत सांगत असतो. मीच सांगितलेली माहिती मी कधी कधी विसरून जातो पण आमचा बारका सुपर कंप्युटर, तो डेटा अचूकपणे स्टोअर पण करतो व अनपेक्षितपणे तोच डेटा नंतर केव्हातरी प्रोसेस करून आम्हाला थक्कही करतो.
असंच काहीसं आज घडलं.
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ गॅबामध्ये सुरु होता. वाॅशिंगटन सुंदर पदार्पणाच्या सामन्यातच एक अप्रतिम अर्धशतक ठोकून आऊट झाला. त्यानंतर आमच्या दोघात झालेला संवाद!
मी: गार्गी, तो बघ आऊट झाला.
गार्गी: तो बिलाट कोली आऊट झाला .. त्यानी ते का फेकलं?
मी: अगं तो विराट कोहली नाहीये, वाॅशिंगटन सुंदर नाव आहे त्याचं. पण कोहलीने काय फेकलं होतं?
गार्गी: अले ते नाही का ते...
मी: काय ते?
गार्गी: ते लागत नाही म्हणून घालतात.
मी: अच्छा, हेल्मेट?
गार्गी: (उद्वेगाने) अले ते नाही.
मी: मग?
गार्गी: (हाताच्या आडव्या टाळ्या वाजवून) ते!!
मी: (तिच्या ॲक्टिंगवर फिदा होत आणि जाम हसत) अच्छा ग्लव्स होय?
गार्गी: हा ग्लव्स!
मग मला आठवलं. गेल्या डिसेंबरमध्ये याच सिरिजची पहिली कसोटी 17 ते 19 दरम्यान झाली होती. त्या कसोटीत विराट आऊट होऊन पॅव्हिलीयनमध्ये परतत असताना सीमारेषेच्या बाहेर जाताच त्याने रागाने आपले हॅन्ड ग्लव्स काढून तिथेच भिरकावून दिले होते. तेव्हा मी गार्गीला तो प्रसंग दाखवून सांगितलं होतं की विराट आऊट झाला म्हणून त्याने आपला राग तसा व्यक्त केला होता. त्याला आऊट नव्हतं व्हायचं. हा प्रसंग तिने लक्षात ठेवला आणि आज एक महिन्याने तिने मला याच प्रसंगाचा दाखला दिला.
लहान मुलं जसं चांगलं शिकवलेलं लक्षात ठेवतात तसच ते मोठ्यांचं चुकीचं वागणंही अचूकपणे लक्षात ठेवतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
P.S. लेकही बापाप्रमाणे "डंब शराड्स" एक्स्पर्ट होणार हेदेखील आज सिद्ध झालं
No comments:
Post a Comment