हातात कॅमेरे घेऊन सावजावर झडप घालू पाहणारी गिधाडे असो अथवा आजचं मुंबई विमानतळावर दिसलेलं हे विदारक चित्र.
एक गट मूळ मुद्दे बासनात गुंडाळून एकाच चाऱ्याचा रोज रवंथ करत असतो. तर दुसरा गट पहिल्या गटाच्या ताटातला 'रुचकर' पदार्थ संपायच्या आत त्याला दुसरा 'जुलाबयुक्त' पदार्थ पटकन वाढून मोकळा होत असतो.
पहिला गट मग खुष होतो की आता पुढचे काही दिवस/महिने जेवणाची भ्रांत मिटली. मग ही मंडळी त्या पदार्थाचं शेण सारवून त्याचा लेप आपल्या टी.व्ही. स्क्रीनवर लावतात.
दुसरा गटही खुष या समाधानाने की लोकांच्या खऱ्या समस्या,आपला खोटारडेपणा, आपलं अपयश, या सगळ्या विषयांवर कोणी आपल्या समोर तोंड उघडू नये याची आपण चोख खबरदारी घेतली.
सुशांतच्या केसचा फास आपल्याभोवती कधीही आवळला जाऊ शकतो हे लक्षात येताच कधी 'दाऊद साहेबांकडून' धमकीचे फोन येतात तर कधी 'वाघाची कातडी' परिधान केलेली मंडळी सवयीनुसार बेताल वक्तव्ये करतात. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 'ट्विटरची राणी' नेहमीप्रमाणे चिवचिवाट करते. या चिवचिवाटाला जोड असते ती 'खोटा नारीवाद', अध्ये-मध्ये उफाळून येणारं 'देशप्रेम' आणि 'डोक्यावर मित्रोंचा' हात यांची. या गोष्टी सोबत नसतील तर सामान्य व्यक्तीने असे धाडस कृपया करू नये!
टिकटॉक, पबजी सोबत 'फेसबुक' आणि 'ट्विटर' या दोन गोष्टी बॅन करायची काळाची खरी गरज आहे. या दोन्ही माध्यमातून घर बसल्या द्वेष, हिंसा, खोटेपणा खूप सहजरित्या पसरवून समाजात दुही निर्माण करता येते. पण खरा धंदा तर इथूनच चालतो ना. मग हीच दुकानं बंद केलीत तर राजकारण कुठल्या पटावरून खेळणार.
देशातील कोरोनाच्या केसेस ४३ लाखांवर गेल्या असताना मुंबई विमानतळावर जाऊन अश्या लुटूपुटू लढाया लढण्याची ही वेळ होती का?
कुठल्याही सेनेची मंडळी असो वा आर.पी .आयचे. इतक्या मोठ्या संख्येने ही मंडळी जमावबंदी असताना एकत्र कशी काय येतात ज्यामध्ये निम्म्या लोकांनी नीट मास्कही घातलेले नसतात आणि तिथे सोशल डिस्टंसिंगचा पूर्णतः बोजवारा उडालेला असतो. त्यात भर म्हणजे या बातमीला कव्हर करायला खूप सारे पत्रकार आणि न्यूज चॅनेलवालेही तिथे हजार होतात आणि काही अनुचित प्रकार टाळायला व गर्दीवर नियंत्रण ठेवायला पोलीसांनाही नाईलाजाने हजर राहावं लागतं. कदाचित "कम कोरोना कम
" या गाण्याच्या चित्रीकरणासाठी हे सगळे सेवाभावी लोक तिथे जमा झाले होते.
केवळ राजकारण चालवायला आणि आपला पुरुषी अहंकार जपायला एका भंपक व्यक्तीला इतकं महत्व दिलं जातंय. केवळ "शांतता राखा" या दोन शब्दांनी देखील इतके झेंडे तिथे जमा नसते झाले पण नाही. या मर्दुमकीमुळे कोरोना केसेसमध्ये नक्कीच लक्षणीय घट दिसून येईल. तिथे येणारे सगळे लोकं 'देशभक्तीचा' काढा नियमितपणे पिऊन कोरोनाला इम्यून झाले होते त्यामुळे त्यांच्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाची अजिबात शक्यता नाही. कोरोना हा केवळ एका विशिष्ठ लोकांपासून पसरणारा व्हायरस आहे.
प्रसारमाध्यमेदेखील आता मूग गिळून गप्प बसतील कारण इथे प्रश्न जात-पातीचा नाहीये. उद्या चुकून कोरोनाच्या केसेस या गर्दीमुळे वाढल्याच समजा तरी ते आकडे आम्ही बाहेर पडूच देणार नाही कारण हे युद्ध आहे वीर योद्ध्यांचं आणि एका वीरांगणेचं. त्यामुळे या युद्धात काहींचे नाहक बळी गेले तरी बेहत्तर.
कारण "तेरी भी चूप मेरी भी चूप"!
"सुशांतके केसमे जेलमे गई रिया,
पगली कंगना, ये तुने क्या बोल दिया,
मुफत्मे अपना ऑफिस तुडवा लिया,
मीडियाको नया चारा खिलवा दिया"
No comments:
Post a Comment