Tuesday, 27 September 2016

"डोन्ट वरी बी हॅपी " च्या निमित्ताने (14th Aug-2016)

मराठी नाटक ..... शेवटचं पाहून किमान ८-९ वर्षे उलटलेली. ते नाटक होतं "नेव्हर माईंड". त्या वेळेस आस्ताद काळे आणि प्राची मते चा उत्स्फ़ूर्त अभिनय आणि नाटकानंतर सर्व कलाकारांसोबत साधलेला छोटासा संवाद या अविस्मरणीय गोष्टी होत्या.

त्या नंतर देखील बरीच नाटकं पहाविशी वाटली पण सोबत कोणी नसल्यामुळे ती नाटके पहायला काही जमलं नाही.

परमेश्वराच्या क्रूपेने माझा व माझ्या "Choice" चा (अर्थात आमच्या सौ) चा "Choice" अगदी तंतोतंत जुळत असल्यामुळे वरील अडसर दूर झाला. पेपर सहज चाळताना ठरवलं की आज एखादं चांगलं नाटक पहायला जायचं म्हणजे जायचंच. "दिल दोस्ती दुनियादारी" ची भुरळ अजूनही तशीच होती म्हणून मला "अमर फोटो स्टूडिओ" पहायचं होतं किंवा जितू आणि गिरीजाचं "दोन स्पेशल" पहायचं होतं. पण शेवटी कौल मिळाला "डोंट वरी बी हॅपी" ला. हे नाटकसुद्धा मला पहायचं होतं. नशिब पण इतकं बलवत्तर की १०० वा प्रयोग म्हणून शो हाऊसफ़ुल होता तरी नेमकी २ तिकिटे शिल्लक होती जी अर्थातच आम्ही गटवली.


स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यग्रूह- पुणे. पहिलीच भेट. अनेक गोष्टींन्ना. नाटकाचा १०० वा प्रयोग म्हणून तिथे जोरदार तयारी केली होती (किंवा आम्ही जोडीने पहायला गेलेलो हे पहिलंच नाटक होतं म्ह्णून कदाचित आमच्या स्वागताप्रित्यर्थ ती जय्यत तयारी  असावी !!) सनई व धोलकी वादन, गालीचा रांगोळी, प्रवेशद्वारापाशी सर्वांन्ना एक पेढा, स्त्रियांना गजरा तर पुरुषांना चाफ़्याचं फुल.
रांगोळी ही सुरेख ज्यामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याचं नाव अधोरेखीत केलेलं. नाट्यग्रूहात गेल्यावर लक्षात आलं की काही निवडक अपवाद वगळता, आम्ही दोघे बालवाडीचे विद्यार्थी वाटत होतो. पण तरीही पुणेरी चोखंदळ प्रेक्षकांसोबत नाटक पाहण्यातली मजा काही औरच!!!




नाटकात जेमतेम ३ पात्रे. उमेश, स्प्रूहा जोशी आणि मिहीर राजदा. नाटक सुरू झालं आणि बघता बघता उमेश कामत ते अक्षरश: एकटा खाऊ लागला. उमेशने जी एनर्जी दाखवली आहे सबंध नाटकात ती खरंच कौतूकास्पद आहे. सच्चे अभिनेते खुलतात ते केवळ रंगमंचावरच असं माझ स्पष्टं मत आहे. 
पण नंतर स्प्रूहाने पण अपेक्षेप्रमाने कमाल केली. मिहीरचा वावर देखील छान होता. त्याचं लेखनसुद्धा जितकं खूमासदार होतं तितकंच अभ्यासपूर्वक पण होतं. विषय गंभीर होता पण खूप छान हाताळला होता. आजच्या पिढीने तर हे नाटक नक्कीच पहायला हवं.





नाटकाव्यतिरिक्त अजूनही बर्याच लक्षात राहण्याजोग्या गोष्टी घडल्या जशा की मध्यंतरादरम्यान चहा आणि वडा पावसाठी केलेली "जंतोजेहेत" . .......... आपल्या 'सहचारीणीला' जे कधी बोलायचं धाडस नाही झालं ते संवाद नाटकात ऐकून अगदी खुर्चीवर उभं राहून जोर जोरात ताळ्या पिटाव्यात असे  अनेक प्रसंग ......... त्यावर बायकोचं लाडिकपणे (रागात) विचारणं की "मी अशी आहे का???"................. आमच्या पावटेगिरीकडे कोण्या चौकस पुणेकराचं नाटकापेक्षा जास्त लक्ष तर नाहीये ना याची सतत खात्री करुन घेणं...... मध्यंतरादर्म्यान आजूबाजूच्या मनाने तरुण असलेल्या लोकांच्या गप्पा आणि बरंच काही.

शेवटी नाटक संपलं. आम्ही उठलो निघायला तर तितक्यात समोर लक्ष गेलं की काही प्रेक्षक स्टेजच्या बाजूने ग्रीन रूम कडे प्रस्ठान करत होते. झालं !!!  "अग्निहोत्र" या सिरियलपासून स्प्रूहा आमची 'क्रश' आणि आता तिला थेट ग्रीन रूम मध्ये भेटण्याची संधी मिळते की काय या विचाराने पाऊले बॅक  स्टेजकडे वळू लागली (अर्थात बायकोच्या सम्म्तीनेच!!). तिथे लोकांची रांग लागली होती "ओम-ईशा" ला जवळून पहायला. 
"एका लग्नाची तिसरी गोष्टं" या मालिकेदर्म्यान आमचं 'प्रेमप्रकरण' सुरू होतं. मालिकेचा प्रवास आणि आमच्या प्रेमप्रकरणाचा प्रवास हा अगदी सारखाच सुरु होता. अजूनही ते दिवस आठवले की अंगावर 'ऊंदीर'...... आय मीन काटा येतो !!! असो.

त्यामुळे ही दोन्ही मंडळी आम्हाला जवळची होती. आम्ही जिथे ऊभे होतो त्या समोरच्या रुममधून एकदम स्प्रूहा प्रकट झाली आणि समोर प्रेक्षकांची रांग पाहून एकदम "ओह!!" असं म्हणून तिचं गोड स्माईल देत बाजूच्या रूम मध्ये जिथे उमेश होता तिथे पळून गेली. मग एक-एक करुन त्या रांगेतल्या प्रेक्षकांन्ना त्या रूम मध्ये सोडू लागले. गंम्मत म्हणजे प्रत्येकाला त्यांच्यासोबत आपला फोटो काढता येत होता जो त्यांचाच एक माणूस काढत होता. मी मूळत: लाजाळू (जरी स्प्रूहा समोर असली तरी!!). असा गोड प्रसंग माझा मलाच कॅप्चर करायला आवडतो कारण जितकं आत्मीयतेने आपण तो क्षण आपल्या कॅमेर्यात कैद करू तितकंच प्रेमाने दूसर कोणी करेल का अशी मला नेहमीच शंका राहते. म्हणून फोटो काढण्यसाठी मी सज्ज झालो. बायको स्प्रूहाशेजारी जाऊन थांबली आणि मला खुणावत होती त्यांच्यासोबत थांबायला. तितक्यात उमेश मला म्हणाला, "अरे, तुम्ही पण या ना, तो काढेल फोटो". 

वाह!! मनात वाटलं चला, आज तरी पुन्हा "सोनाली कुलकर्णी" सीन रिपीट नाही होनार. मग मी लागलीच उमेशच्या बाजूला जाऊन थांबलो. हे सारं सत्य आहे की स्वप्न हे कळायच्या आत समोरच्या मनुष्याने क्लिक चं बटन दाबलं आणि माझं सुरेख "हिमस्तंभ" रूप त्याने आमच्या कॅमेर्यात कैद केलं. शालेय जिवनात कोणाला "ऑड मॅन आऊट" जर अवघड जात असेल तर माझा हा दुर्लभ फोटो दाखविण्यात यावा ज्याने करून त्याला हा कनसेप्ट अगदी क्लिअर होईल!! असो.

या वेळी मी धाडस करून मनात जे आलं ते बोलंलोच (अर्थात उमेश ला बरं का !!). त्या वाक्यानंतर दोघांन्नी बायडीला शुभेच्छा दिल्या. हा प्रसंग कुठलाही कॅमेरा साठवून ठेवू शकत नाही. तो केवळ त्या मनांमध्ये कायमचा कोरला जातो.




केवढे हसलो आम्ही त्या दिवशी देवा!!! आणि काही सेंटी सीन्समध्ये बायकोकडे लक्षही ठेवावं लागत होतं (नेहमीप्रमाने) जेणे करून ती त्यामध्ये गुंतू नये.

मग तिथून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा उरलेलं सेल्फ़ी/बॅकफ़ी सेशन झालं. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात राहील ती म्हणजे "ती शेवटची धाव" आणि "ती कर्तबगारी" :)



बर्याच वर्षांनी नाट्यग्रूहाकडे पाउले वळली आणि काय तो आल्हाददायक अनुभव वाह!!!






तिथून निघताना मात्र आम्ही दोघे एकमेकांन्ना बजावत निघालो की 
"डोन्ट वरी बी हॅपी" !!!

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...